गडचिरोली : आदिवासीबहुल गावांच्या विकासासाठी प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविली जाते.मात्र या योजनेंतर्गत ४० टक्के निधी अद्याप मिळालेला नाही.त्यामुळे गावांचा विकास रखडला आहे.याबाबत आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ३ मार्च रोजी निवेदन दिले.
आदि आदर्श ग्राम विकास योजना ५ जुलै २०२३ पासून राबविली जाते.यासाठी देशातील ३ हजार ६०५ गावांची निवड केली असून दरवर्षी एक पंचमांश गावांना अंदाजे २०.३८ लाख इतका निधी प्रति गाव एकाचवेळी उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे.मात्र या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समिती स्तरावरुन निधीच उपलब्ध झालेला नाही.त्यामुळे आदिवासीबहुल गावांचा विकास रखडल्याचा दावा अजय कंकडालवार यांनी केला आहे.यासंदर्भात कंकडालवार यांनी ३ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन दिले.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
दोन वर्षांपासून निधी का मिळाला नाही.विलंब का झाला याची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी अजय कंकडालवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.