सिरोंचा : येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मन्नेवार समाज भवनाच्या संरक्षण भिंतीसाठी नगर पंचायत सिरोंचा तर्फे १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज दिनांक 22 जून 2025 रोजी नगर पंचायतचे उपाध्यक्ष मा. बबलू पाशा यांच्या हस्ते पार पडले. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यात सहभाग नोंदवला.
सदर निधीचा वापर समाज भवनाच्या चारही बाजूंनी संरक्षक भिंत (कॉम्पाऊंड वॉल) उभारण्यासाठी केला जाणार आहे. ही भिंत समाज मंदिराचे रक्षण तर करेलच, शिवाय भवन परिसर अधिक सुरक्षित व आकर्षक दिसेल.
या कार्यासाठी विधिवत पूजा करण्यात आली. नारळ फोडून भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी परिसरात प्रसाद व पूजा साहित्य ठेवण्यात आले होते. बबलू पाशा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.सदर कामासाठी निधी मिळवण्यासाठी नगरपंचायत उपाध्यक्ष मा. बबलू पाशा यांनी विशेष प्रयत्न केले. समाजाच्या मागण्या आणि गरजा ओळखून त्यांनी प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज हा निधी मंजूर होऊ शकला.
“ मन्नेवार समाज भवन हे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू आहे. त्यासाठी संरक्षक भिंतीची गरज होती आणि ती आज पूर्ण होत आहे, ही समाधानाची बाब आहे,” असे पाशा यांनी सांगितले.
या कार्यात गावकऱ्यांचा सहभागही लक्षणीय होता. मन्नेवार समाजातील ज्येष्ठ मंडळींपासून तरुणांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. अनेकांनी बबलू पाशा यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांचे आभार मानले.
ही केवळ सुरुवात असून,मन्नेवार समाजाच्या इतर गरजांसाठीही पुढे निधी मिळवून विकासकामे सुरू राहतील, असे मनोगत बबलू पाशा यांनी व्यक्त केले.ग्रामविकास व सामाजिक सलोख्यासाठी अशी कामे अत्यंत आवश्यक असतात. बबलू पाशा यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास गावाचा सर्वांगीण विकास नक्कीच शक्य आहे.