सिरोंचा तालुक्यातील अनेक वृद्ध, निराधार लाभार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे अनुदान पोस्ट पेमेंट बँक खात्यांवर नियमितपणे जमा होत आहे.मात्र हे पैसे काढण्यासाठी जेव्हा लाभार्थी पोस्ट ऑफिसमध्ये जातात, तेव्हा त्यांना “तांत्रिक अडचण” असल्याचे कारण देऊन रक्कम देण्यास नकार दिला जातो.परिणामी, गरजूंना आपले हक्काचे अनुदानापासून वंचित रहावं लागत आहे.मागील अनेक महिन्यांपासून हक्काचे अनुदानासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे सुरूच आहेत.सिरोंचा तालुक्यातील सदरहू गंभीर समस्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी डाक विभागाचे उपविभागीय डाक निरीक्षक श्री. विकेश कुमार यांचे लक्षात आणुन दिले. तसेच तालुक्यातील पोस्टाचे खातेधारांना IPBP मार्फत रक्कम काढण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे विनंती केले.
लाडकी बहीण योजना,संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री किसान योजना, घरकुल अनुदान, विहीर अनुदान, आधार लिंक असलेल्या इतर योजना असे अनेक केंद्र व राज्य सरकारचे योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक (IPPB) खात्यांवर जमा होतात. या योजना सरकारच्या समाजकल्याणाच्या उद्दिष्टांचा भाग आहेत. मात्र,जेव्हा या रकमा प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत,तेव्हा योजनांचा मूळ उद्देशच अपयशी ठरतो.
स्थानिकांनी या संदर्भात सब डिव्हीजनल इन्स्पेक्टर,पोस्ट पेमेंट बँक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “तांत्रिक कारणांमुळे सध्या व्यवहारांमध्ये अडचणी येत आहेत” असे उत्तर दिले. मात्र,ही समस्या काही दिवसांची नसून अनेक महिन्यांपासून सुरू आहे,असे पोस्टाचे खातेदार सांगत आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणे ही एक केवळ टाळण्याची कारणमीमांसा असल्याचा आरोपही खातेधारांनी केला आहे.
बहुसंख्य लाभार्थी आदिवासी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत.त्यांना मोबाईल,नेटबँकिंग,ATM अशा सुविधांची माहिती नाही. त्यांची सर्वाधिक अवलंबन ही पोस्ट ऑफिसवर असते.अशा वेळी पोस्ट ऑफिसमधूनच जर रक्कम नाकारली गेली, तर हे लोक अक्षरशः हवालदिल होतात.कुणी प्रवासाचा खर्च उधारीवर करत आहेत, तर कुणी वैद्यकीय गरजांसाठी पैसे न मिळाल्याने त्रस्त आहेत.शिक्षण, आरोग्य व अन्नासारख्या मूलभूत गरजाही भागवणे कठीण झाले आहे.
या गंभीर समस्येबाबत पोस्ट विभाग,जिल्हा प्रशासन व संबंधित यंत्रणा कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही आहे.नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी तोंडी तक्रार करूनही त्यावर कोणत्याही प्रकारचे कार्यवाही होत नाही.दरम्यान काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी उपविभागीय डाक निरीक्षक विकेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आला.
हा विषय केवळ तांत्रिक अडचणींचा नसून,गरिबांच्या अधिकारांचा हनन आहे. शासनाने योजनांची रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी IPPB खात्यांचा अवलंब सुरू केला खरा,पण त्या प्रणालीमध्ये अडचणी असल्यास पर्यायी व्यवस्था,मोबाईल बँकिंग व्हॅन, कॅश ट्रांजिट सेवा अश्या उपाय करणे आवश्यक आहे.
IPBP अंतर्गत पोस्टाचे खातेदारांना अनुदान काढण्यासाठी तात्काळ योग्य सुविधा करण्यात यावी अन्यथा कांग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल,असे ईशारा सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.