


गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती प्रक्रियेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार आणि कागदपत्रात खोटेपणा झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजय रामय्याजी कंकडालवार यांनी केला आहे.याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना निवेदन पाठवून संपूर्ण भरती प्रक्रियेची सखोल पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कंकडालवार यांच्या म्हणण्यानुसार, भरती प्रक्रियेच्या काळात बालविकास प्रकल्प अधिकारी, स्थानिक अंगणवाडी सुपरवायझर,लिपीक तसेच बाहेरील दलाल मंडळींनी संगनमत करून इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी १ ते २ लाख रुपयांची लाच घेतली.काही प्रकरणांत ही रक्कम भरून नोकरीही लावण्यात आली,तर काहींना फसवून पैसेही परत करण्यात आले नाहीत,असेही निवेदनात नमूद आहे.
यासोबतच भरतीसाठी आलेल्या अर्जांतील कागदपत्रात खोडसाळ बदल करून मार्क वाढविण्यात आले आणि शैक्षणिक अर्हता नसतानाही काही अपात्र अर्जदारांना पात्र ठरवून निवड करण्यात आली.माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवलेल्या कागदपत्रांतून ही बाब उघडकीस आली असून,१२वी उत्तीर्ण नसतानाही बनावट गुणपत्रक व टीसी जोडल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.
काही तक्रारदारांकडून पैसे मागितल्याचे व्हिडीओ पुरावे देखील उपलब्ध असल्याचा दावा कंकडालवार यांनी केला आहे.यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून,जनतेच्या विश्वासाला तडा गेला आहे.
पोलीस विभागामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत या प्रकरणात शासनाने तत्काळ लक्ष घालण्याची गरज असल्याचेही श्री.कंकडालवार यांनी स्पष्ट केले आहे.