Home मुख्य बातम्या शासनाच्या अनियमित कारभाराविरोधात 9 जुलैपासून ; जिल्हा परिषद कार्यालयासमोर अजय कंकडालवार यांचे...

शासनाच्या अनियमित कारभाराविरोधात 9 जुलैपासून ; जिल्हा परिषद कार्यालयासमोर अजय कंकडालवार यांचे आमरण उपोषण

2
0

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक अजय रामय्याजी कंकडालवार यांनी ९ जुलै २०२५ पासून जिल्हा परिषद गडचिरोली कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.त्यांनी दिनांक ३० जून रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कंकडालवार यांच्या मते,अहेरी व भामरागड तालुक्यांतील अंगणवाडी भरतीपासून ते जलजीवन मिशनच्या कामांपर्यंत विविध योजना भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्या असून, नागरिकांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही.काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या योजनांत निकृष्ट दर्जाचे पाईप व नळजोडणी करून लाखो रुपयांची कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत.तसेच,काही ठिकाणी एकाच कामाचा अनेक यंत्रणांमार्फत दाखला देत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे.

भामरागड तालुक्यातील विकास कामांमध्येही गंभीर त्रुटी असून,योजनेच्या नावाखाली कामांचे केवळ कागदोपत्री अस्तित्व आहे.काही कामांत डोंगरातील मोठे दगड वापरून केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.योजनांची फलकंही लावलेली नसून पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसून येतो.

या सर्व बाबींची वेळोवेळी चौकशीची मागणी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने श्री.अजय कंकडालवार यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सविनय प्रतिलिपी पाठवली आहे.

या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि प्रशासन त्याला काय प्रतिसाद देते,याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here