अहेरी : अहेरी ते देवलमरी रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाला अवघे दोनच महिने होत आले असताना,पावसाच्या पहिल्याच सरीत हा रस्ता अक्षरशः उखडून गेला आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून,निकृष्ट दर्जाचं काम उघड झालं आहे.
रस्त्याच्या कामात खडी आणि गिट्टीचा वापर केवळ नावालाच झाला असून, ठिकठिकाणी मातीच माती आणि चिखल साचलेला आहे. या मार्गावरून शालेय बस सेवा थांबली असून, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतंय.या संपूर्ण प्रकारावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संताप व्यक्त करत ठेकेदारावर आणि संबंधित विभागावर थेट आरोप केले आहेत.हे रस्ता नाही,तर जनतेच्या पैशावरचा भ्रष्टाचाराचा थेट पुरावा आहे,असा घणाघात त्यांनी केला आहे.
त्यांनी मागणी केली आहे की,संबंधित कंत्राटदारावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी.त्यांनी प्रशासनालाही इशारा दिला की, जर ही चौकशी न झाली तर जनता रस्त्यावर उतरेल.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उध्वस्त झालेलं डांबरीकरण,उघड पडलेली खडी,आणि खड्ड्यांचा सडा पाहता,हे काम किती फसवं आहे यावर संशयच उरत नाही.
जनतेच्या सुरक्षेची आणि पैशाची अशी थट्टा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई झाली नाही, तर अहेरी–देवलमरी रस्त्याचा विषय आता जिल्ह्याच्या आंदोलनाचा वणवा ठरू शकतो.