अहेरी : विधानसभा क्षेत्रात युरिया व डीएपी खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचे उत्पादनाचे गणित कोलमडले आहे. ऐन खरीप हंगामात खताचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.खतांच्या तुटवड्यामुळे शेतीचे नियोजन कोलमडल्याने अनेक शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही भागांत खतासाठी रांगा लावाव्या लागत असूनही शेतकऱ्यांच्या हाताला निराशाच लागते आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ युरिया व डीएपी खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “जर प्रशासनाने वेळेवर उपाययोजना केली नाही, तर आगामी काळात अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.”
“शेतकऱ्यांना वेळेत खते मिळाली नाहीत, तर सरकारच्या यंत्रणांवरचा विश्वास उडेल,” असे म्हणत कंकडालवार यांनी कृषी विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.शेतकरी संघटनांनीही लवकरच आंदोलनाचा इशारा दिला असून, प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.