एटापल्ली : तालुक्यातील येलचील गावाजवळ आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या या अपघातात काळे दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांची दोन चिमुकली मुले – तीन वर्षांची आरोही आणि काही महिन्यांचे पावली बाळ – यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
विशाल काळे व त्यांच्या पत्नी शीतल काळे हे कुटुंबासह एटापल्ली येथून काही कामानिमित्त दुचाकीने जात होते. दरम्यान, येचली गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला आदळली. अपघात इतका भीषण होता की, चिमुकल्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या हृदयद्रावक घटनेची माहिती तुषार विरमवार व चक्रधर कावळे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत काळे दाम्पत्याच्या पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून,काळे कुटुंबाच्या दुःखद यातनांमध्ये प्रशासनानेही तत्काळ मदतीचे पाऊल उचलावे,अशी मागणी होत आहे.