अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परीसरातील बसफेरी बंद असल्याने या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत.प्रवासासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रेगुंठा बसफेरी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रेगुंठा कोटापल्ली परिसरात जवळपास 20 गावे येतात या गावांमधील शेतकरी, विध्यार्थी तसेच नागरिक रोज सिरोंचा मुख्यालयात असलेले तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक अशा विविध कार्यालयात कोणत्या ना कोणत्या कामानिमित्ताने तालुका मुख्यालयात यावे लागते.मात्र बस सेवा बंद असल्याने जीव धोक्यात घालून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना शारीरिक, मानसिक त्रासासोबत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.रेगुंठा परिसरातील गावांसाठी अहेरी आगारातून सिरोंचा रेगुंठा आणि गडचिरोली रेगुंठासाठी बससेवा सुरू होती.मात्र कोरोना काळापासून ही बससेवा बंद करण्यात आले आहे.मार्च महिन्यांपासून एसटी महामंडळादारे राज्यात महिलांना 50 टक्के सवलतीत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसरातील 20 गावातील नागरिकांना या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. बसफेरी बंद असल्याने महिला व पुरुष खासगी वाहनांच्या टपावर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. नागरिकांची समस्या घेऊन दैनिक लोकमतने अनेक वेळा बातमी प्रकाशित केली होती.प्रशासनाने या वृत्ताची दाखल घेऊन फेब्रुवारी महिन्यात सिरोंचा रेगुंठा बसफेरी सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे रेगुंठा व्येंकटापूर मार्गावरून मागील पंधर वर्षांपासून बंद असलेल्या बससेवा शुद्ध सुरू करण्यात आला होता.बससेवा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.मात्र नागरिकांना हा आनंद फार काळ टिकला नाही.अवघ्या चार पाच दिवसांत पुन्हा पूर्णपणे बससेवा बंद झाली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे बसगाडी येत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने खासगी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत आहे.हे खासगी वाहनचालक कोंबड्यांप्रमाणे माणसांना वाहनात कोंबून वाहने चालवतात.अनेकदा वाहनांत जागाच नसल्याने गाडीच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो. आधीच हा दुर्गम ,घनदाट जंगलाचा आणि दऱ्याखोऱ्यांचा भाग आहे.अशात गाडीच्या टपावर बसलेल्या नागरिकांच्या जिवाला धोका असतो. मात्र तालुका मुख्यालयी अनेक महत्वाची कामे अडून असल्याने किंवा एखाद्या वेळेस कुणी गंभीर आजारी असल्यास नागरिकांना अशा धोकादायक प्रवासाशिवाय पर्याय नसतो.म्हणून लवकरात लवकर या परिसरात बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.