अहेरी : वन्ट्रा नाल्याला दरवर्षी येणाऱ्या पूरामुळे परिसरातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटत असून ग्रामस्थांना हालहवाल विचारायलाही अडथळा निर्माण होतो.या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी वन्ट्रा पूल आणि परिसरातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान गावातील नागरिकांनी पुलाची उंची वाढवण्याची जोरदार मागणी केली.पूर आल्यावर नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागते.त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.आणि रुग्णवाहिका,आपत्कालीन सेवा यांनाही अडथळा निर्माण होतो.शाळकरी मुलं,शेतकरी,आणि दैनंदिन कामासाठी जाणारे नागरिक यांना याचा मोठा फटका बसतो.
ग्रामस्थांनी सांगितले की,दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवते,मात्र अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही.पुलाची उंची वाढवून त्याची क्षमता वाढवली तर पूराच्या पाण्याचा प्रवाह अडथळा न येता जाऊ शकतो आणि संपर्क कायम राहील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.