अहेरी : आल्लापल्ली ग्रामपंचायतीच्या कथित भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला आहे.माजी सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अज्जू पठाण यांच्या नेतृत्वाखाली,आल्लापल्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.दि.11 सप्टेंबर 2025, गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता हे उपोषण सुरू झाले असून, आल्लापल्ली येथील समस्त नागरिक आणि अन्यत्रस्थ मजूर मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहेत.
तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावे, गावातील नळयोजनेची चौकशी करण्यात यावी.तसेच पेसा अंतर्गत मागील तीन वर्षांतील निधीची माहिती जाहीर करावी,अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.याआधी ही पठाण यांनी 13 ऑगस्ट रोजी वरील विषयावर माहिती मागितली होती.त्यासोबत 19 ऑगस्ट ला झालेल्या आमसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता मात्र त्यावर आलापल्ली ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रतिसाद न मिळाल्याने 25 ऑगस्ट ला माहितीच्या अधिकारा द्वारे माहिती मागितली आहे.
आलापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२४-२५ या हंगामातील तेंदुपत्ता संकलन केलेल्या मजुरांचे मेहनतिचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत.सोबतच कोटयावधी रुपयेखर्चून तयार केलेली आलापल्ली गावातील नळ योजना बंद पडली असून,यासंदर्भात चौकशी व खुलासा करण्यात यावा.
पेसा अंतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील शिल्लक निधी, मंजूर रक्कम व ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा.ह्या विविध मागणीला घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व माजी सरपंच अज्जू पठाण ह्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव हणमंतु मडावी यांनी बेमुदत उपोषण मंडपला भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आली आहे.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,राजू दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,स्वप्नील मडावी,नरेश गर्गम् प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचर्या आदी उपस्थित होते.